भिगवण – भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील वनउद्यानात आकर्षक सुविधा निर्माण झाल्याने इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उद्यान आकर्षण ठरत आहे. माजी मंत्री व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नांतून भरणेवाडी परिसरातील डोंगरावर या वनउद्यानाच्या माध्यमातून बिरोबा बनात नंदनवन तयार झाले आहे.
भरणेवाडी येथील बिरोबा मंदीर परिसरातील प्रचंड निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या वनउद्यानात उभी राहिलेली स्वागत कमान पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. आतील परिसरात पर्यटकांसाठी 10 किमी परिसरातील पाहणी करून निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी उंच अशी 3 टेहळणी मनोरे उभारणी केली आहे. दूरवरती दिसत असलेल्या डोंगर टेकड्यांना अगदी हिरवा शालू पांघरल्यासारखे दिसणारे मनमोहक दृश्य तसेच परिसरामध्ये अनेक प्रकारची झाडे लावली आहेत.
पर्यटकांना बसण्यासाठी सुंदर पाच पॅगोडा निर्मिती केली आहे. वन्यप्राण्यांच्या प्रतिकात्मक 15 पुतळे बनिवण्यात आले आहेत. पर्यटकांना बसण्यासाठी 3 पॅगोडा व 5 बाकडी बनविण्यात आली आहेत. सायंकाळी परिसर प्रकाशमय होण्यासाठी 13 सौरदिवे बसिवले आहेत. प्राण्याची माहिती सांगणारे फलक तसेच 14 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तसेच विश्रांतीकक्ष निर्मिती करण्यात आली आहे.
वन उद्यानातून ऑक्सिजन
भरणेवाडी येथील वनउद्यान पर्यटनाबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी ठरणार आहे. याठिकाणी देशी ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असलेली वड, पिंपळ, करंज, जांभूळ आदी विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षाचे संवर्धन केले जाणार आहे. यातूनच ऑक्सिजन पार्क संकल्पना पुढे आली आहे.