पिंपरी – कोणतेही यश मिळविण्यासाठी तयारी महत्त्वाची असते. सराव करण्यासाठी वेळ मिळत नसतो, तर तो दैनंदिन कामकाजातून काढावा लागतो, असे मत आयर्नमॅन सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी व्यक्त केले. दैनिक प्रभातच्या पिंपरी विभागीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. या वेळी त्यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला.
आयर्नमॅन सहायक पोलीस निरीक्षक गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 14 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी नूर सुलतान येथे पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत गोमारे यांनी सहभाग घेत त्यांनी आयर्नमॅन हा किताब मिळविला. राम गोमारे यांनी आयर्नमॅन होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेचे स्वरूप सांगितले.
ते म्हणाले, या स्पर्धेत 3.8 किलोमीटर पोहणे (2.20 तासांत पूर्ण करावे लागते), 180 किलोमीटर सायकल चालविणे (8.30 तासांत पूर्ण करावे लागते), 42 किलोमीटर धावणे (6.30 तासांत पूर्ण करावे लागते) असे तीन टप्पे असतात. हे तिन्ही टप्पे 17 तासांत पूर्ण करायचे असतात. मात्र, मी ते 11 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केले.
सरावाला सुरुवात केल्यानंतर हे तिन्ही प्रकार 17 तासांत पूर्ण करू अशी खात्री होती. मात्र सराव वाढल्यानंतर ही वेळ कमी झाली. 18 वर्ष वय पूर्ण असणारा प्रत्येकजण या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतो. शरीरासह मनाचाही कस पाहणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपल्या शहराचे आणि देशाचे नाव उंचवावे, असे आवाहन देखील गोमारे यांनी केले.
भविष्यातील नियोजनाबद्दल सांगताना गोमारे म्हणाले, यापुढे अल्ट्रा आयर्नमॅन ही स्पर्धा आहे. ती देखील पूर्ण करायची आहे. त्यांनतर मॅरेथॉन, सायक्लोथॉन, डेक्कन क्लिप हॅंगर्स, सायकल रेस अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे.
आयर्नमॅन होण्याची प्रेरणा एका आयर्नमॅनचीच
आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेण्याची प्रेरणा पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून मिळाली. त्यांनी देखील ही स्पर्धा पूर्ण केली आहे. यापुढे जाऊन त्यांनी अल्ट्रा आयर्नमॅन ही देखील स्पर्धा पूर्ण केली आहे. केवळ इच्छा असून काहीही होणार नाही, त्यासाठी मनाची तयारी आणि त्याला परिश्रमाची जोड हवीच. त्यामुळे पुढील काळात आणखी कठीण स्पर्धा पूर्ण होतील, अशी खात्री आहे.