भोर : भोर नगर परिषदेने यापूर्वी मागील चार वर्षाची करवाढ 2018-19 या वर्षामध्ये केली होती. 10 टक्के वाढ एका वर्षाला कधीही झालेली नाही. मागील चार वर्षात आणि पुढील चार वर्षासाठी वर्षाला अडीच टक्के वाढ झालेली असून, ती शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसारच केली आहे. थकबाकीदार असलेल्या विरोधकांनी दिलेली महिती दिशाभूल करणारी असून, केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे माजी उपनगराध्यक्ष समीर सागळे यांनी सांगितले.
भोर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सागळे बोलत होते. यावेळी माजी गटनेते सचिन हर्णसकर, सुमंत शेटे, चंद्रकांत मळेकर,जगदीश किरवे, गणेश पवार, बजरंग शिंदे, गणेश मोहिते, शांताराम पवार, देवीदास गायकवाड उपस्थित होते.
भोर नगरपरिषदेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीत2018-19 मध्ये वाढ करण्यात आली होती. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नियमानुसार दर चार वर्षांनी करपात्र मूल्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार 2022-23 मध्ये भोर नगरपरिषदेने चतुर्थ वार्षिक कर आकरणीचे काम हाती घेतले; परंतु दोन वेळा निविदाधारक अपात्र ठरल्याने तिसऱ्या वेळी निविदा सादर केल्या.
2022-23 मध्ये सर्वसाधारण सभेत 12 ऑगस्ट 2022 ने करपात्र मूल्यांमध्ये दरवाढ न करण्याचा ठराव केला; परंतु नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या 16 जून 2022 च्या पत्रानुसार नगरपरिषदांना सक्षम करण्यासाठी व विकासकामांसाठी पूर्णतः शासनावर अवलंबून न राहता नगरपरिषदेचे विविध करवाढ करणे आवश्यक आहे.
कर नगररचना विभागाने कर आकारणी दर सूचीमध्ये 10 टक्के वाढ करावी असे सूचित केले होते त्याचप्रमाणे सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या 27 डिसेंबर 2022 च्या पत्रानुसार मालमत्ता कराच्या उत्पन्नात सर्व नगरपरिषदांनी वाढ करणे बंधनकारक असून तरच विकास कामांना निधी दिला जाईल असे सांगितले होते त्यामुळे कर आकारणी दरसूचीमाध्ये 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेमके कोणत्या गटाचे ?
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी नेमके कोणत्या गटात आहेत, हेच समजत नाही. या पक्षांचे कोणतेही नेते, पदाधिकारी भोरला आले की हजर असतात त्यामुळे प्रथम त्यांनी आपला गट जाहीर करावा मगच नगरपलिकेवर बिनबुडाचे आरोप करावेत.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरोप केले जाततात, असा टोला नितिन सोनावले आणि विठ्ठल शिंदे यांचे नाव न घेता कॉंग्रेस नगरसेवकांनी लगावला.