शिक्रापूर -येथील परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला आणि त्या पुरातून कारसह वाहून जाणाऱ्या दोघांना वाचविण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला यश आले.
अनुकुमार विश्वनाथ जाधव (रा. हिवरेरोड, शिक्रापूर) व निसार करीम शेख (रा. शिक्रापूर; मूळ रा. पिंपरखेड, ता. जामखेड) अशी या दोघांची नावे आहेत. बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शिक्रापूर येथील ओरा सिटी लगतच्या ओढ्याला देखील मोठा पूर आला.
यावेळी पुरातून स्विफ्ट कार (एमएच 14 बीआर 4644) वाहून जाऊन पुराच्या मध्यभागी झाडाला अडकली. कारमधील दोघे बचावासाठी मोठमोठ्याने ओरडत होते. काही नागरिकांनी शिक्रापूर पोलिसांना याची माहिती दिली.
तातडीने पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, हवालदार संजय ढमाळ, शिपाई लक्ष्मण शिरसकर, होमगार्ड मनोहर पुंडे, योगेश बधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ढमाळ व पुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता ओढ्याच्या पुराच्या पाण्यात उडी घेतली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्यातील दोघांना बाहेर काढण्यात आले.