तातडीच्या कामासाठी प्रत्येकी 30 लाखांची मान्यता
वाघोली – पुणे महानगरपालिकेत एक वर्षापूर्वी समाविष्ट झालेल्या 23 गावांतील तातडीच्या खर्चासाठी प्रत्येकी 30 लाख रुपयांच्या खर्चाला वित्तीय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयाला जोडून देण्यात आलेल्या गावांसाठीचा खर्च त्या क्षेत्रीय कार्यालयाने करावयाचा आहे. नागरिकांची मागणी आणि गावातील तातडीने सोडवायच्या समस्येसाठी हा निधी खर्च करता येणार आहे. यामुळे समाविष्ट गावांचा कायापालट होणार आहे.
महापालिका निवडणुकांचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याने प्रशासकराज आणखी काही काळ सुरू राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर सयादी नसल्याने प्रभागस्तरीय कामांसाठी निधीची चणचण निर्माण झाली होती. मात्र, आता हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी सध्याच्या प्रत्येक प्रभागात तातडीच्या कामांसाठी एक कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता दिली आहे. या आदेशामुळे प्रभागस्तरीय तातडीची कामे आणि देखभाल दुरुस्तीसाठी 162 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे समाविष्ट गावांतील समस्या सोडवण्यास मदत होणार आहे.
पुणे महानगरपालिकेत गावे समाविष्ट झाल्यानंतर रखडलेल्या कामांसाठी भरीव निधीची गरज आहे. त्यामुळे हा निधी पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्वरित वितरित करून नागरिकांचा प्रश्न सोडवावा.
– रामभाऊ दाभाडे, नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष