शरद बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
राजगुरूनगर – उत्तर पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील 100 भूमिपुत्र कीर्तनकारांचा सन्मान आणि तालुक्यातील 200 भजनी मंडळ व सामाजिक संस्थांना सतरंजी व पिण्याचे जार वाटप कार्यक्रम सोमवार (दि. 27) आयोजित केला आहे.
खेड तालुक्यात पहिल्यांदा तालुक्यातील 100 कीर्तनकारांचा एकत्रित सन्मान सोहळा संतोषनगर-भाम (ता. खेड) येथील साईकृपा मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता होणार आहे. यावेळी कीर्तनकारांचा स्मृतिचिन्ह, संपूर्ण वारकरी उभा पोशाख, तुळशीचे रोपटे देऊन सन्मान केला जाणार आहे.
तसेच तालुक्यातील 200 भजनी मंडळे व सामाजिक संस्थाना सतरंजी व पाणी पिण्याचे जार वाटप होत आहेत. यावेळी पंकज महाराज गावडे यांचे प्रवचन होणार आहे. तसेच वरील नियोजित कार्यक्रमापूर्वी दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान डॉ. ताराचंद कराळे यांचे श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट व पायोनियर हॉस्पिटल यांचे माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असून तालुक्यातील वारकर्यांनी व भजनी मंडळातील सदस्यांना शिबिराचा फायदा होईल.
कीर्तनकार यांचा सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच तालुक्यातील ज्येष्ठ व नवीन कीर्तनकार, महिला कीर्तनकार आणि बाल कीर्तनकार प्रथमच एकत्रित येत आहेत. समाजाला प्रबोधन करून योग्य दिशा देण्याचे काम कीर्तनकार करीत असतात.
तालुक्यात पहिल्यांदा असा आगळावेगळा कार्यक्रम होत असून या भक्तिमय सोहळ्यासाठी वारकरी मंडळी व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे.