आळेफाटा ( नारायणगाव) :- नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कांदळी नगदवाडी (ता. जुन्नर) जवळील शिंदेमळा याठिकाणी चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी पतीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
संध्या सुरेश शिंदे असे खून झालेल्या पत्नीचेचे नाव असून सुरेश दगडू शिंदे (वय 59 रा. शिंदेमळा नगदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर सुशांत सुरेश शिंदे (वय 31, रा. कांदळी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, आरोपी सुरेश याला पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे झाली होती.
शनिवारी (दि. 1) मध्यरात्री 12.30 च्या सुमारास सुरेश मद्यप्राशन करून घरी आला त्यावेळी त्याचे आणि मृत संध्या यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. यावेळी आरोपी सुरेश शिंदे यांने चारित्र्याचा संशयाचा राग मनात धरून संध्या यांचा गळा दाबून खून केला.
खून केल्यानंतर तो नारायणगाव येथे येऊन एका ठिकाणी बसला होता. घटनेनंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे करीत आहेत.