पुणे – शहरातील निवासी मिळकतींना 40 टक्के सवलत देण्याच्या प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी बैठक होणार असल्याने महापालिकेच्या करसंकलन आणि लेखापाल विभागाच्या संबधित प्रतिनिधींना माहिती घेऊन सोमवारी मंत्रालयायात बोलविण्यात आले होते. या प्रतिनिधींकडून आवश्यक असलेली माहिती तसेच उपस्थित शंकांचे निरासन करून घेण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडून 1970 पासून ही सवलत दिली जात होती. मात्र, शासनाच्या ऑडिटमध्ये त्यावर आक्षेप घेण्यात आले. त्यावर महापालिकेने सन 2019 पासून नवीन मिळकतींना ही सवलत देणे बंद केले असून, अशा सुमारे 1 लाख 67 हजार मिळकती आहेत. तर पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुमारे 97 हजार मिळकतींची सवलतही रद्द केली आहे. मात्र, या दोन्ही निर्णयांस पुणेकरांनी तीव्र आक्षेप घेतल्याने पालिकेने एक पाऊल मागे घेत 97 हजार नागरिकांना वाढीव कर तूर्तास भरू नये, असे जाहीर केले आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदारांसोबत बैठक घेऊन हा निर्णय कायम ठेवण्याची घोषणा केली. अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेने अद्याप मिळकतकराची बिले छापलेली नाहीत. तर शासनाचाही निर्णय झालेला नाही. परिणामी, महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. मात्र, शासनाकडून मागील आठवड्यात हा निर्णय मंत्रिमंडळात मांडण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. हा प्रस्ताव अंतिम करण्यापूर्वी असलेल्या काही महत्वाच्या बाबींची माहिती सादर करण्यासाठी महापालिकेस सूचना केल्या होत्या.
एक सवलत मिळणार, दुसरी जाणार
पुणेकरांना निवासी मिळकतींची 40 टक्के सवलत कायम ठेवण्यावर सकारात्मक असले, तरी दुसऱ्या बाजूला या सवलीती सोबतच मिळकतीची देखभाल दुरूस्ती म्हणून दरवर्षी 15 टक्के सवलत दिली जाते. मात्र, ही सवलत 10 टक्केच देणे कायद्याने अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाकडून 40 टक्के सवलत कायम ठेवली, तरी देखभाल दुरूस्तीची सवलत 15 वरून 10 टक्के केली जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच शहरातील सरसकट सर्व मिळकतींची ही सवलत रद्द होऊ शकते. त्यामुळे एका बाजूला पुणेकरांना 40 टक्के सवलतीचा दिलासा मिळाला तरी दुसऱ्या बाजूला 5 टक्के बोजा वाढणार असल्याचे चित्र आहे.