पुणे – पुणे-लोणावळा लोकल अर्थात उपनगरीय रेल्वेतून 2022-23 या आर्थिक वर्षात 1 कोटी 80 लाख जणांनी प्रवास केला. यातून पुणे विभागाला 11.28 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागाला उपनगरीय रेल्वेतून इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळूनदेखील या मार्गावर ट्रेन्सची संख्या वाढवण्यास रेल्वे प्रशासन अनुत्सुक आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे-लोणावळा लोकल सेवा 11 मार्च 1978 रोजी सुरू झाली. पुणे शहरात महत्वाची शासकीय कार्यालये, शाळा आणि कॉलेज असल्यामुळे पिंपरी चिंचवड, तळेगाव, लोणावळा आदी ठिकाणांवरून नागरिक शहरात येतात. तर पिंपरी-चिंचवड, तळेगाव, आणि चाकण परिसरात एमआयडीसीचा विकास झाल्यामुळे लोणावळा आणि ग्रामीण भागातून नागरिक या परिसरात कामाला येतात. करोनापूर्वी पुणे ते लोणावळा मार्गावर लोकलच्या 44 फेऱ्या सुरू होत्या. पण, आता ही संख्या 40 पर्यंत खाली आली आहे.
तर, पुणे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी शिवाजीनगर लोकल टर्मिनस सुरू करण्यात आले. येथून सध्या सहा लोकल फेऱ्या सुरू आहेत. करोनानंतर लोकलची प्रवासी संख्या वाढली आहे. पण, रेल्वे प्रशासनाने करोनापूर्वी सुरू असलेल्या पुणे-लोणावळा लोकल मात्र बंद केल्या आहेत. दुपारी लोकल बंद केल्यामुळे शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेतही फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पण, रेल्वे प्रशासन सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
लोणावळा ते दौंड सेवा असावी
पुणे ते दौंड मार्गाला अजूनही उपनगरीय रेल्वेचा दर्जा देण्यात आला नाही. या मार्गावर दररोज हजारो प्रवासी असतात. या मार्गावर डेमू आणि मेमू सेवा सुरू आहे. त्यामुळे पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय रेल्वेचा दर्जा द्यावा, लोणावळा ते दौंड मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.