पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी आता 15 मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना “आरटीई’ अंतर्गत मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. “आरटीई’ अंतर्गत राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 3 लाख 64 हजार 413 बालकांच्या पालकांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल झाले होते. ऑनलाइन लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांना प्रवेश जाहीर झालेला आहे. प्रतिक्षा यादीत 81 हजार 127 बालकांचा समावेश आहे. पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करुन प्रत्यक्षात 49 हजार 820 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झालेले आहेत.
सोयीच्या व नामांकित शाळांमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे बहुसंख्य पालकांनी आपल्या बालकांचे प्रवेशच निश्चित केलेले नाहीत. यामुळे प्रवेशाच्या 52 हजार 26 प्रवेशाच्या जागा अद्यापही रिक्तच आहेत. यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाबाबतच्या तक्रारी आणि अपील अर्जांबाबत सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढण्यासाठीही 15 मे पर्यंतच मुदत देण्यात आलेली आहे. लॉटरीद्वारेची निवड यादीतील बालकांची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
-शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालक