पुणे – गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केटयार्डातील फळ विभागात नुकतीच 73 किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार 110 ते 211 रुपये भाव मिळाला. मागील वर्षीही 31 मे 2021 रोजी मार्केट यार्डात सीताफळाची पहिली आवक झाली होती. त्यावेळी किलोस 60 ते 121 रुपये भाव मिळाला होता.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते युवराज काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम बनवारी या फर्मवर आणि गणेश घुले यांच्या शारदा गजानन फर्मवर ही आवक झाली. यावर्षी दोन्ही गाळ्यांवर वडकी गावातून आवक झाली आहे. काची यांच्या गाळ्यावर सुनील दशरथ कोलते यांच्या शेतातून, तर घुले यांच्या गाळ्यावर अमृत आंबेकर यांनी माल विक्रीस आणला होता. तो सिद्धार्थ खेडेकर यांनी खरेदी केला. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. वडकी, पुरंदर तालुका, यवत, उरुळी कांचन, राजगुरूनगर, खेड भागांतून आणि सातारा जिल्ह्यातून आवक होत असल्याची माहिती व्यापारी युवराज काची, माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
मागील काही वर्षात करोनाचा फटका सीताफळ विक्रीला बसला होता. आईस्क्रीम, पल्प उद्योग, ज्युस विक्रेते आणि लग्नासाठी असलेल्या लोकांच्या मर्यादामुळे सीताफळांना मागणी नव्हती. मात्र, यावर्षी सीताफळाला चांगली मागणी राहील. परिणामी चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
– युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड
सीताफळाची लागवड इतर फळांच्या तुलनेने कमी खर्चात होते. पाणीही तुलनेने कमी लागते. त्यामुळे विविध भागातील शेतकऱ्यांकडून सीताफळाची लागवड करण्यात येत आहे. त्या तुलनेत सीताफळाला प्रक्रिया उद्योगांकडून मागणी वाढली आहे. घरगुती ग्राहकांकडूनही खरेदी करण्यात येत आहे.
– माऊली आंबेकर, व्यापारी, मार्केट यार्ड