पुणे – सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात गुंड हातात कोयते घेऊन दहशत माजवतानाचे व्हिडिओ व्हायरल होताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत गुन्हेगारांची धरपकड सुरु केली. दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून इतरांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.
बालाजीनगर धनकवडी परिसरात रजनी कॉर्नर येथे फुकट भाजी दिली नाही म्हणून गुंडांनी संबंधित तरुणाला मारहाण केली असून पाया पडायला लावले. तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय त्याच ठिकाणी रायडिंग करत दुचाकीस्वारांवर हल्ले केले जात आहेत. या सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या असून त्याचे फुटेज व्हायरल झाले आहेत. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, व्हिडिओमध्ये एका अल्पवयीन मुलाला पाया पडायला लावणे, कोयते घेऊन परिसरात फिरणे, महिलांची छेड काढणे अशा प्रकारचे गुन्हे करतानो काही गुडांचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. काही वृत्तवाहिण्यांवर ते झळकताच पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत सहकारनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
यासंदर्भात परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता, आम्ही वारंवार तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. यामुळे गुन्हेगारांचा आत्मविश्वास बळावला आहे. पोलिसांनीही सर्व प्रकाराची माहिती आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित रहात आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन व धनकवडी पोलीस चौकीतून नागरिकांना सांगितले जाते की तुम्ही तिथे राहू नका, ? त्यामुळे पोलिसांवर देखील आता या गुंडांची दहशत बसली आहे का ? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या साथीदारांचा ठावठिकाणा शोधला जातोय. या टोळीतील काही गुंडांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित असून त्याचीही कार्यवाही देखील सुरू आहे. या गुंडांनी काही दिवसांपुर्वी पुन्हा एकदा भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याने हा सगळा प्रकार समोर आलाय. या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी यांनी दिली.
“दोन्ही व्हिडिओमध्ये वेगवेगळे आरोपी दिसत आहेत. यातील काहींवर तडीपारीची कारवाई सुरु आहे. उरलेल्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मिडियावर दिसल्यास त्यांनी तातडीने पोलिसांना कळवावे” – सागर पाटील, (उपायुक्त, परिमंडळ – 2 )