पुणे – थकित बीलामुळे वीजपुरवठा खंडीत केल्याच्या रागातून तरूणाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ महिलेचा विनयभंग केल्याची घटना खडकीतील राजीवगांधीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणासह एका महिलेविरूद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वरिष्ठ तंत्रज्ञ असून १४ सप्टेंबरला संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास राजीवगांधी नगरमध्ये गेल्या होत्या. त्याठिकाणी आरोपी महिलेच्या घरातील थकित वीजबीलासंदर्भात दोघींमध्ये वादावादी झाली. त्याच कारणातून आरोपी महिलेच्या साथीदाराने वरिष्ठ तंत्रज्ञ यांचा हात पकडून विनयभंग केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम तपास करीत आहेत.