पुणे – खानावळीच्या (मेसच्या) आडून घरफोड्या करणाऱ्या आचाऱ्यास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एकून 15 गुन्हे उघडकीस आले आहे. या गुन्हयातील सहा लाख 64 हजाराचा ऐवजही हस्तगत केला आहे. आकाश अशोक उमाप (रा.वानवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाचा समांतर तपास करताना हा गुन्हा एका आचाऱ्याने केल्याची खबर पोलीस नाईक नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानूसार विकासनगर, वानवडी भागात सापळा रचून आकाश अशोक उमापला ताब्यात घेतले.
न्यायालयातून पोलीस कोठडी घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने मी स्वतः आचारी असून लोकांना डबे पुरवण्याचे काम देखील करतो. तुम्हाला माझे बाबत मिळालेली माहिती चुकिची आहे. असा आव आणून खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच हडपसर मधील साथिदारांसह यापुर्वी पुणे शहरामधे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
आकाश उमाप हा वानवडी परिसरात एका मेसच्या ठिकाणी जेवण बनवण्याचे व डबे पोहोचवण्याचे काम करतो. या कामाच्या आडून पुण्यातील विविध परीसरात बंद घरांची रेकी करायचा. यानंतर साथिदारांसोबत घरफोडी चोरी, वाहन चोरी, जबरी चोरी असा नित्यक्रम त्याने चालू ठेवला.
आचारीपणाचा आव घेऊन परत मेस मधे काम करून आपण काहिच करत नाही या अविर्भावात वावरत असे. त्याची सखोल चौकशी करत असताना त्याने सदरचे गुन्हे हे त्याने रेकॉर्ड वरील आरोपी नामे जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलु, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारूळे (दोघे राहणार बिराजदार नगर, हडपसर) यांचे सोबत केल्याचे सांगितले आहे.
त्याने 13 घरफोडी व एक वाहनचोरी अशा एकूण 15 गुन्हयांची कबुली दिली. त्याचे ताब्यातून चोरी केलेले 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे वस्तु व दागिणे, दोन दुचाकी, दोन टिव्ही व रु 46,000 रोख असा एकूण रु. सहा लाख 64 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर व सुहास तांबेकर यांनी केली आहे.