शारजा – अखेरच्या षटकापर्यंत झालेल्या रंगतदार लढतीत राहुल त्रिपाठीने फटकावलेल्या धडाकेबाज षटकाराच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर नाट्यमय विजय मिळवला.
त्यापूर्वी सलामीवीर व्यंकटेश अय्यर व शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिल्यामुळे कोलकाताचा विजय निश्चित झाला होता. मात्र, अखेरच्या तीन षटकांत सामन्याचे चित्रच बदलले व कोलकाता पराभवाच्या छायेत आला. अखेर त्रिपाठीने हा धोका दूर करत संघाचा विजय साकार केला. कोलकाताने हा सामना 3 गडी राखून जिंकला.
या विजयाच्या जोरावर त्यांनी थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला असून येत्या शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जशी विजेतेपदाची लढत होणार आहे. क्वालिफायर 2 मधील बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीला अत्यंत अचूक गोलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 135 धावांवर रोखले. त्यानंतर कोलकाताच्या अय्यर व गिल या सलामीवीरांनी संघाला 96 धावांची भक्कम सलामी दिली व विजयाचा पाया रचला.
यंदाच्या स्पर्धेत तुफान भरात असलेला व्यंकटेश अय्यर सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने त्याच जोशात अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, त्यानंतर विनाकारण धाडसी फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 55 धावांच्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. तो बाद झाल्यावर आलेल्या नितीश राणानेही अनावश्यक फटका खेळून आपली विकेट गमावली.
त्याने 12 चेंडूत 13 धावा केल्या. त्यानंतर गिल स्थिरावलेला असताना तसेच अर्धशतकाच्या जवळ आलेला असतानाही अनावश्यकपणे आपली विकेट बहाल केली. त्याने 46 चेंडूत 46 धावा केल्या. माजी कर्णधार दिनेश कार्तिकही खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. कर्णधार इयान मॉर्गननेही निराशा केली. विजयासाठी 7 धावा हव्या असताना तो खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर शकीब अल हसन व सुनील नरेनही निराशाजनक पद्धतीने फलंदाजी करून बाद झाले. त्यावेळी कोलकाताला 2 चेंडूत 6 धावांची गरज होती.
अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार खेचत त्रिपाठीने विजय साकार करत संघाला अंतिम फेरी गाठून दिली. रवीचंद्रन अश्विनने सलग दोन चेंडूत दोन गडी बाद केले होते. मात्र, त्याची हॅट्ट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. दिल्लीकडून रवीचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा व अनरीच नोर्जे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. आविश खानने 1 बळी मिळवला.
शिखर धवन, श्रेयस अय्यर व शेमरन हेटमायर यांनी केलेल्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 5 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या डावाची सुरुवात झाल्यावर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर मार्कस स्टोनिस व कर्णधार ऋषभ पंतही साफ अपयशी ठरले.
त्याचवेळी फलंदाजीत बढती मिळालेल्या श्रेयस अय्यरने धवनला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धवन 39 चेंडूत 36 धावा करून पुन्हा एकदा आततायी फटका खेळून बाद झाला. त्यावेळी अय्यरला साथ देताना हेटमायरने चांगली खेळी केली. त्यानंतर अय्यरने संघाला 5 बाद 135 अशी किमान समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 2 गडी बाद केले. लॉकी फर्ग्युसन व शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 5 बाद 135 धावा. (शिखऱ धवन 36, पृथ्वी शॉ 18, मार्कस स्टोनिस 18, शेमरन हेटमायर 17, श्रेयस अय्यर नाबाद 30, अक्सर पटेल नाबाद 4, वरुण चक्रवर्ती 2-26, लॉकी फर्ग्युसन 1-26, शिवम मावी 1-27). कोलकाता नाईट रायडर्स – 19.5 षटकांत 7 बाद 136 धावा. (व्यंकटेश अय्यर 55, शुभमन गिल 46, नितीश राणा 13, राहुल त्रिपाठी नाबाद 12, कागिसो रबाडा 2-23, रवीचंद्रन अश्विन 2-27, अनरीच नोर्जे 2-31, आविश खान 1-22).