Pune Crime | मोटारीची खासगी वाहतूक संवर्गात नोंदणी करण्याची बतावणीने फसवणूक; RTO दलालाविरोधात गुन्हा दाखल

पुणे,दि.17 – प्रवासी मोटारीची खासगी वाहतूक संवर्गात नोंदणी करण्यासाठी एकाकडून एक लाख 47 हजार रुपये उकळणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातील एका दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल अर्जुन सोनवणे (रा. थिटे वस्ती, खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अजीम मिसार इबुशे (28 , रा. कोल्हापूर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजिम यांची मोटार प्रवासी वापरासाठी आहे. त्यांना खासगी वाहतूक संवर्गात मोटारीची नोंदणी करायची होती.

त्यांनी एका परिचितामार्फत सोनवणेची भेट घेतली होती. सोनवणेने मोटारीची खासगी संवर्गात नोंदणी करण्यासाठी एक लाख 25 हजार रुपये तसेच काम मार्गी लावण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

अजिम यांनी ऑनलाइन पद्धतीने सोनवणेला एक लाख 45 हजार रुपये पाठविले. पैसे मिळाल्यानंतर सोनवणेने मोटार नोंदणी करून दिली नाही. अजिम यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा माझ्याकडून रक्कम खर्च झाली आहे.

मी तुमचे काम करू शकत नाही. लवकरच तुमचे पैसे परत देईल, असे त्याने अजिम यांना सांगितले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अजीम यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.