पुणे – वकील महिलेला खंडणी मागणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेने पकडले. सनी उर्फ दशरथ शाम म्हेत्रे (वय ३३, रा. भवानी पेठ), सागर राजू बग्गन (वय ३३, रा. नक्षत्र बंगला, मोझे वस्ती, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
भवानी पेठेतील तक्रारदार वकील महिलेचे झेरॉक्सचे दुकान तसेच कार्यालय आहे. दुकानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत वाहने लावण्यात आल्यानंतर म्हेत्रे आणि साथीदार बग्गन यांनी वाहनचालकांकडून पैसे घेण्यास सुरूवात केली. वकील महिलेने तिची दुचाकी काही दिवसांपूर्वी लावली. त्या वेळी म्हेत्रे आणि बग्गन यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. वकील महिलेने दोघांकडे विचारणा केली. तेव्हा या भागातील सर्व दुकानांच्या समोर दुचाकी लावल्यास पैसे द्याावे लागतात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेजण पसार झाले होते. दोघेजण भवानी पेठेतील पूना कॉलेजसमोर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. आरोपींविरोधात यापूर्वी अमली पदार्थ बाळगणे, जबरी चोरी, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमोल पवार, अजय थोरात, महेश बामगुडे, तुषार माळवदकर यांनी ही कारवाई केली.