नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी करण्याचे आज ठरले आहे. पुढील वर्षी म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 मध्ये ही निवडणूक होईल. त्यावेळी पक्षाध्यक्ष होण्याच्या प्रस्तावावर आपण विचार करू असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस कार्यकारीणीची आज बैठक झाली. त्यात पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम हा एक महत्वाचा विषय होता. त्यानुसार पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम निश्चीत करण्यात आला असून पुढील वर्षीै ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
आज झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारावे असा त्यांना आग्रह झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री ए. के. ऍन्टोनी अदिंनी त्यांना हा आग्रह केला.
त्यावेळी त्यांना आपण या प्रस्तावाचा विचार करू असे म्हटले आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले आहे.
त्यानंतर त्यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी वारंवार गळ घातली गेली आहे. पण अजून त्यांनी दाद दिलेली नाही. तथापि आता त्यांनी विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपुर्वी विविध राज्यांच्या प्रदेश शाखांची निवडणूक प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे.