पुणे – राष्ट्रीय पातळीवरील टेनिसपटू राधिका राजेश महाजन हिची रॅकेट प्रवासात हरवली. पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने तिला हरवलेली रॅकेट पुन्हा मिळवून देऊन भेट दिली.
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली राधिका वडिलांबरोबर चेन्नई येथे गेली होती. राखी पौर्णिमेच्या दिवशी (२२ ऑगस्ट) ती पुण्यात परतली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून दोघे जण रिक्षाने घरी गेले. प्रवासात राधिकाच्या दोन रॅकेट रिक्षात विसरल्या. राधिकाला हैद्राबाद येथील एका स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. रॅकेट महागडी असल्याने राधिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर तातडीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात रॅकेट हरविल्याची तक्रार देण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची महाजन यांनी भेट घेतली आणि त्यांना परिस्थिती सांगितली.
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना त्वरित तपास करण्याची सूचना दिली. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस शिपाई विशाल दळवी आणि पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाणे ते राजेंद्रनगर दरम्यान असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांनी केलेले चित्रीक रण पडताळले. एके ठिकाणी राधिका आणि तिचे वडील ज्या रिक्षातून प्रवास करत होते, त्या रिक्षाच्या वाहन पाटीवरील क्रमांक कॅमेºयांनी टिपला होता. वाहन पाटीवरील क्रमांकावरून पोलिसांनी रिक्षाचालकाचा नाव, पत्ता शोधला. पोलिसांनी रिक्षाचालकाकडून दोन रॅकेट परत मिळवल्या.
पोलिसांनी महाजन यांच्याबरोबर संपर्क साधला आणि त्यांना रॅकेट परत मिळाल्याचे सांगितले. त्या वेळी राधिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. राधिकाचे वडील पोलीस आयुक्तालयात आले. त्यांनी पोलीस आयुक्त गुप्ता आणि रॅकेट परत मिळवून देणाऱ्या पथकाचे आभार मानले. पोलीस आयुक्तांना पत्र पाठवूनही त्यांचे आभार मानले.