पालघर – वसईत एका 17 वर्षीय बेवारस मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नोव्हेंबर 2020 ते या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत या तीन जणांनी या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप आहे.
या दुर्दैवी मुलीची कहाणी अशी आहे की तिची आई कुटुंबाला सोडून गेली आहे. त्यामुळे सदर मुलगी तिच्या वडिलांबरोबर राहात होती. काही दिवसांपूर्वी तिचे वडीलही मरण पावले. त्यामुळे ही मुलगी अनाथ झाली. ती ज्या घरात राहात होती, त्या घरमालकानेही तिला बाहेर काढले.
त्यामुळे ही मुलगी फूटपाथवर राहून दिवस काढीत होती. ही मुलगी रेल्वे पोलिसांना विमनस्क अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला काही समाजसेवी संस्थांच्या मदतीने मदत करून तिला बोलती केली त्यावेळी तिने आपल्यावर गुदरलेली कहाणी पोलिसांना ऐकवली.
तिने दिलेल्या माहितीनुसार तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना पोलिसांनी शोधून काढले. यातील पहिला आरोपी सापडला त्याचे नाव अजयकुमार विनोद जयस्वाल असे आहे. त्याने दिलेल्या माहिती नंतर मुन्ना यादव व अक्रम चौधरी या अन्य आरोपींना अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी या मुलीवर उपचार करून तिचे पुनर्वसन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.