पुणे – दोन तरुणींना आपआपसात चुंबन घेताना रोखल्याने एका व्यसन मुक्ती केंद्रातील 64 वर्षीय केअर टेकर महिलेला चौघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी महिलेला मारहाण करत दात देखील तोडला आहे. पुण्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रात ही घटना घडली आहे.
या प्रकरणी चौघांवर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 64 वर्षीय पिडीत केअर टेकर महिलेने सिंहगड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्या पुण्यातील कृपा फाऊंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या केअर टेकर होत्या. उपचार करुन पुण्यात परतल्यानंतर शनिवारी (दि.10) त्यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून, 19 फेब्रुवारी 2021 रोजी, सायंकाळी 5 च्या सुमारास व्यसनमुक्ती केंद्रात 2 तरुणी एकमेकांचे चुंबन घेत होत्या. त्यावेळी पीडित महिलेने दोन्ही तरुणींना एकमेकांना किस करण्यापासून रोखले होते. त्यामुळे संतापलेल्या तरुणींनी आपल्या अन्य 2 साथीदारांच्या मदतीने पिडित महिलेला बेदम मारहाण केली.
मारहाणीत आरोपींनी पीडित महिलेचा दात तोडला. या घटनेनंतर पीडित महिला उपचारासाठी मुंबईला गेली होती. उपचारानंतर 4 महिन्यांनी पुण्यात परतल्यानंतर तिने संबंधित आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड पोलीस घटनेचा तपास करत आहेत.