- पिंपरीतील मनसे पदाधिकाऱ्यांकडून राम मंदिराची प्रतिकृती भेट
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार राहण्याची सूचना केली. तसेच यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये मोठ्या जोमाने काम करा. नागरिकांच्या सेवेसाठी मनसेचे जास्तीतजास्त नगरसेवक सभागृहात असले पाहिजे. त्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरा अशी सूचना केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, मनसेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. ठाकरे यांना राम मंदिराची प्रतिकृती भेट देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीविषयी चर्चा झाली.
यासाठी लवकरच राज ठाकरे शहरातील मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शहरातील विकासासाठी मनसे नेहमीच कटिबद्ध आहे. तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनसे नेहमी पुढे असत. नागरिकांचा आवाज होण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत मनसेचे जास्तीजास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे. त्यासाठी निवडणुकीच्या तयारीला लागा. करोनाच्या काळात मनसेने नागरिकांना केलेली मदत यापुढेही सुरू ठेवा. तसेच निवडणुकीसाठी जोमाने तयारी करा अशा सूचना राज ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या.
लवकरच शहराचा दौरा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे लवकरच शहराचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच शहरात महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाराबाबत त्यांच्याकडे माहिती पोहचली आहे. त्यामुळे आगामी दौऱ्यात सत्ताधारी भाजपच्या कारभाराचा राज ठाकरे खरपूस समाचार घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. लवकरच ते शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
– हेमंत डांगे, शहराध्यक्ष, विद्यार्थीसेना, मनसे.