पुणे – व्यापाऱ्यावर गोळीबार करुन लूटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. दत्तनगर येथील बालाजी ट्रेडिंग सेंटरच्या मालकावर गोळीबार केल्याची घटना 14 फेब्रुवारीला घडली होती.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडूनही करण्यात येत होता. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडलेल्या आरोपीकडून गुन्हयात सहभागी झालेल्या इतर आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत.
अशोक गोविंदराव गवई(रा.यश अपार्टमेंट, वारजे माळवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. रामधन भगीरथी विश्वकर्मा(रा.संतोषनगर, कात्रज, मुळ उत्तरप्रदेश), सुरजकुमार आणी राजासिंग उर्फ राजकुमार (संतोषनगर , मुळ उत्तरप्रदेश) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. व्यापारी विशाल प्रल्हाद पंजाबी (36) हे घटनेत जखमी झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी गुन्हा केल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मात्र त्यांचा माग लागत नव्हता. तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे पोलीस शिपाई जगदिश खेडकर यांनी अशोक गोवईच्या घरचा पत्ता मिळवला.
पोलिस पथकाने तेथे धडक दिली असता, गवई घरी सापडला नाही. दरम्यान पोलीस नाईक प्रणव संकपाळ, पोलीस शिपाई संतोष अनुसे व शिवदत्त गायकवाड यांना गवई आंबेगाव चौकात येणार असल्याची खबर मिळाली. त्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चाकैशी केली असता, त्याने तीघा साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार गणेश सुतार, पोलीस अंमलदार प्रणव संकपाळ जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, संतोष अनुसे, मंगेश बोरुडे यांच्या पथकाने केली.