पुणे – आरोग्य विभागाच्या वतीने गट (ड) संवर्गातील पदासाठी 31 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या लेखी परिक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी 406, 420, 34 सह विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणार्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 6, कलम 8 नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोग्य विभागाने राज्यभरातील विविध पदासाठी लेखी परीक्षा घेतल्या आहेत. या परीक्षा चांगल्याच वादग्रस्त ठरल्या.आरोग्य विभागातील ड संवर्गातील पदाच्या निवडीची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान होती. परंतु, या परीक्षेचा पेपर त्यादिवशी सकाळी साडेआठ वाजताच व्हायरल झाला होता. अनेक मुलांना हा पेपर व्हॉटसअपवर मिळाला होता. एका कागदावर पेनाने प्रश्न व उत्तरे लिहिलेला पेपर फुटला होता.
दरम्यान, त्याचवेळी पेपर फुटल्याची तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु, त्याबाबत आरोग्य विभागाकडून काहीही माहिती न दिल्याने तेव्हा गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र आता स्वत: आरोग्य विभागाने पेपर फुटल्याचे मान्य करत पोलिसात तक्रार दिली आहे. या लेखी परीक्षेच्या 100 प्रश्नांपैकी 92 प्रश्न व उत्तरे लिखित स्वरुपात माहितीचा पेपर फोडून ती माहिती प्रसारित करुन शासनाची व परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस.हाके करीत आहेत.