पुणे – गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना बनावट कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने शिवाजीनगर तसेच खडकी न्यायालयाच्या आवारात कारवाई करून पकडले. या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून बनावट शिधापत्रिका, आधारकार्ड, सातबारा उतारे, छायाचित्र, रबरी शिक्के असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपाळ कुंडलिक कांगणे (वय 33, रा. मोरवाडी, पिंपरी ), रवी राजू वाघमारे (वय 29), हसन हाजी शेख (वय 25), सागर अनंत काटे (वय 25, सोनू हरी शिंदे (वय 20), सलीम सायधन शेख (वय 27, रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव), इनकर सुंदर कांबळे (वय 38, रा. आनंदनगर, चिंचवड), रोहित विद्यासागर पुटगे (वय 24, रा. वैदू वस्ती, पिंपळे गुरव), किरण दादाभाऊ सूर्यवंशी (वय 27, रा. आदर्शनगर, पिंपळे गुरव), मंगेश महादेव लोंढे (वय 31, रा. पिंपळे सौदागर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शिवाजीनगर, खडकी न्यायालयाच्या आवारात बनावट कागदपत्रांच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेतील उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी शिवाजीनगर, खडकी न्यायालयात पाळत ठेवली होती. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून सातजणांना तसेच खडकी न्यायालायाच्या आवारातून तीन जणांना अशा दहाजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जामीन मिळवून देण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली.
पोलीस निरीक्षक विनायक जाधव, सहाय्यक निरीक्षक विवेक पाडवी, उपनिरीक्षक विकास जाधव, खडके, शेडगे, संजय गायकवाड, गुंगा जगताप, टेंगले,काळे, मनोज साळुंके, संदीप जाधव, राहुुल जोशी, मारूती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विश्वनाथ घोणे, गणेश लोखंडे, रेहाना शेख,नितेश जाधव, योगेश मोहिते आदींनी ही कारवाई केली.