पुणे – किरकोळ अपवाद वगळता मतमोजणी शांततेत

कोरेगाव पार्क : कडेकोट पोलीस बंदोबस्त, चोख व्यवस्था

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य गोदाम येथे करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या चोख नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे ही सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली. ईव्हीएमबद्दलच्या किरकोळ तक्रारी समोर आल्या. मात्र, त्यावर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळीच निर्णय आणि तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टळली.

पुण्याची मतमोजणी संथ
दरवेळच्या निवडणुकांप्रमाणे यंदाही पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी अन्नधान्य गोदाम येथे झाली. यासाठी मतमोजणीच्या एका टेबलावर एकूण तीन कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर यावर देखरेख ठेवण्यासाठी एका सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या दोन मतदारसंघांसाठी सुमारे 2 ते अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. मतमोजणीच्या प्रक्रियेवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक लक्ष ठेऊन होते. फेरीनिहाय मतांची माहिती आयोगाला पाठविण्यात येत होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरदेखील आकड्यांचे अपडेट्‌स तातडीने मिळत होते. पण, बारामती लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीच्या तुलनेत पुणे मतदारसंघांची मतमोजणी प्रक्रिया काहीशी संथ असल्याचे दिसून आले.

याबाबत नवलकिशोर राम यांना विचारले असता, ते म्हणाले की, यामध्ये काही विशेष नाही. एखाद्या मतदार संघाची फेरी लवकर होऊ शकते. त्यामुळे संथ वगैरे असे काही म्हणता येणार नाही. एखादे मशीन बंद पडण्याचा प्रकारही होतो. एवढ्या मोठ्या प्रक्रियेत जर एखादी मशीन बंद पडली तर ते प्रमाण टक्केवारीच्या दृष्टीने नगण्य ठरते. त्यावर लगेचच सोल्यूशन काढण्यात येते. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर होतो असे होत नाही. त्यामुळे त्याबाबत निश्‍चिंत रहावे.

पहिला कल आला 10 वाजण्याच्या सुमारास
दरम्यान, गुरुवारी सकाळी 7 वाजता ईव्हीएम ठेवलेली स्ट्रॉंगरूम उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडली गेली. तेथेही कडेकोट बंदोबस्त होता. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएमवरील मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात आली. त्याचवेळी वेगळ्या कक्षात टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीचा निकाल सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघनिहाय कक्ष
पुणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यानुसार वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदारसंघनिहाय मतमोजणी कक्षांची उभारणी करण्यात आली. त्यानुसार विधानसभा मतदारसंघनिहाय इव्हीएमवरील मतमोजणी करण्यात आली. एका फेरीसाठी सुमारे 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागत होता. शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या सूचना देण्यासाठी प्रत्येक कक्षात ध्वनिक्षेपकाची सुविधा पुरविण्यात आली होती. अशीच सुविधा बारामती मतदारसंघाच्या दौंड, इंदापूर, पुरंदर, बारामती, भोर आणि खडकवासला मतदासंघासाठी करण्यात आली होती.

पहाटेपासूनच “नो व्हेईकल झोन’
मतमोजणी केंद्र परिसरातील काही रस्ते गुरुवारी पहाटेपासूनच “नो व्हेईकल झोन’, वाहतुकीस बंद करण्यात आले होते. तर काही मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आली होती. मतमोजणी केंद्रापर्यंत फक्‍त पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याच वाहनांना प्रवेश देण्यात येत होता. फायरब्रिगेड, रुग्णवाहिका यांसाठी मात्र हा नियम शिथिल करण्यात आला होता. रिस्ट्रीक्‍ट एरियामध्ये लावलेले वाहने पोलिसांच्या वाहतूक विभागाने तातडीने उचलली आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

भौतिक सुविधांमुळे दिलासा
पुणे आणि बारामती मदारसंघाच्या मतमोजणीसाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत होते. शिवाय केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या, एसआरपीएफ आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. शिवाय माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी शुद्ध आणि थंड पाणी, नाश्‍त्यासाठी पोहे, उपमा, केळी सोबतच चहाची सुविधा पुरविण्यात आली होती. तर, जेवणामध्येदेखील दर्जेदार अन्न पुरविण्यात आले. तर, उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक कक्षात कूलरची सुविधा देण्यात आली. त्यामुळे उकाड्यातही वातावरण काहीसे सुसह्य झाले.

ईव्हीएमच्या तक्रारीमुळे प्रक्रिया थांबली

पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना सकाळी 10.30च्या सुमारास दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी सुरू होती. त्याचवेळी शिवाजीनगर मतदारसंघाच्या कक्षातील टेबल क्रमांक 1 येथील ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. संबंधित कर्मचाऱ्याकडून चुकीचे बटण दाबले गेले. त्यामुळे ही संपूर्ण मोजणी प्रक्रिया ठप्प झाली. मशीनमध्ये नेमका काय बिघाड झाला, हे बराच वेळ कोणालाही समजत नव्हते. त्यावेळी ईव्हीएमची तांत्रिक तपासणी करणाऱ्या व्यक्‍तीला बोलविण्यात आले. त्यालादेखील सुरूवातीला हा बिघाड लक्षात आला नाही. त्याचवेळी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवलकिशोर राम यांना बोलविण्यात आले. त्यावेळी यंत्रातील संबंधित बिघाड लक्षात येताच मतमोजणीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. यावेळी भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित प्रकाराबद्दल विचारत परिस्थिती समजून घेत सामंजस्याची भूमिका घेतली. परंतु, या सर्व गोंधळात सुमारे तासभर वेळ वाया गेला. त्यामुळे पुढच्या टप्प्यातील मतमोजणी उशिरा सुरू झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.