राष्ट्रवादीची एकजूट निष्फळ!

घराणेशाहीला विकासकामांतून चपराक बसल्याचा भाजपचा दावा 
पिंपरी – गेली 25 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाचा “टायमिंग’ साधून विधानसभेमध्ये भाजपने स्वत:ची “पोळी’ भाजली. इच्छुकांमध्ये तू-तू मैं-मै सुरू असतानाच आयत्यावेळी पवार कुटुंबियांमधील उमेदवार लादल्याने मावळ तालुक्‍यातील विस्कटलेली राष्ट्रवादी एकजूट होत एकदिलाने काम केले. मात्र तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पराभवाची चव चाखावी लागली. पार्थ पवार यांचा लाखोंच्या मतांनी पराभव झाला असला तरी मावळ तालुक्‍यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन अधोरेखित करणारे ठरले.

मावळ लोकसभेसाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव केला. मावळ तालुक्‍याचा इतिहास पाहता मावळ तालुक्‍याने आजपर्यंत प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेला भाजपलाच आघाडी दिली. या वेळी भाजपविरोधी सर्व गट-तट एकत्र आल्याचे चित्र वेगळे राहिले. मात्र ते प्रत्यक्ष मतदानातून दिसून आले नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आणि जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक बाळसाहेब नेवाळे यांनी जीवाचे रान करून प्रचार केला. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एकी पार्थ पवार यांना विजय मिळवून देऊ शकली नाही. या उलट भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाळा भेगडे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. महायुतीचा धर्म पाळत शब्दाखातर बाळा भेगडे यांनी मन लावून प्रचार केला आणि अधिकचे लीड मिळविण्यासाठी काम केले आणि खासदार बारणे यांच्या विजयासाठी मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, 2008 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशी शिवसेनेने हॅटट्रिक केली. या मतदारसंघात आझम पानसरे, राहुल नार्वेकर यांना पराभव पहावा लागला. सतत पराभव होत असतानाही लोकसभेच्या उमेदवारीवरून तीव्र स्पर्धा होऊ नये म्हणून पवार कुटुंबियांकडून पार्थ पवार यांना उमेदवार देण्यात आली. आता विधानसभेची गणिते डोळ्यासमोर ठेवून या वेळी बापूसाहेब भेगडे आणि बाळासाहेब नेवाळे ही दोनच नावे चर्चेत आहेत. यापैकी नेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षकार्यापासून फारकत घेतली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र ते पार्थ पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे विधानसभेबाबत ते काय भूमिका घेतात, यावर बरेच अवलंबून आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात घराणेशाहीच्या विरोधात सर्वसामान्यांचे नेतृत्त्व म्हणून श्रीरंग बारणे यांना मतदारांनी कौल दिला आहे. घराणेशाहीला नाकारले आहे. हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि मतदारांच्या विश्‍वासाचा विजय आहे. संपूर्ण देशातील निकाल पाहिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्‍वास आणि देशातील विकासावर मतदारांनी शिक्‍कामोर्तब केले आहे.

– बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार, मावळ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)