पुणे –गेल्या 24 तासात रविवारी 6 हजार 299 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे शहराचा पॉझिटिव्हिटी दर 35.33 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. त्याचबरोबर सक्रिय बाधितांची संख्याही वाढत आहे. सध्या सक्रिय बाधितांची संख्या 46 हजार 863 आहे. त्यातील 50 बाधितांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. याशिवाय, 28 जणांना इव्हेसिव्ह व्हेंटिलेटर लावले आहे. ऑक्सिजन लागणाऱ्या बाधितांची संख्याही वाढली असून, त्यांची संख्या 322 आहे.
गेल्या 24 तासांत 17 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील 11 बाधित पुणे शहरातील आहे. या वर्षात सर्वाधिक मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. याशिवाय, सहा बाधित पुण्याबाहेरील आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बाधित मृतांची संख्याही वाढत आहे. यांचा समावेश करून शहरातील मृतांची संख्या 9 हजार 192 झाली आहे.
बाधितसंख्या गेली सहा लाखांच्यावर
आजपर्यंतच्या बाधितांची संख्या सहा लाखांच्या वर गेली असून, ती 6 लाख 6 हजार 379 झाली आहे. तर बरे झालेले रुग्ण 5 लाख 50 हजार 324 आहेत. बाधितांमधील 9 हजार 192 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत तब्बल 42 लाख 36 हजार 964 संशयितांच्या स्वॅबटेस्ट झाल्या आहेत. दिवसभरातील 17 हजार 825 टेस्टचा त्यात समावेश आहे.