पुणे – शहरात शुक्रवारी 2 हजार 757 नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली. तर सक्रीय बाधितांची संख्या तब्बल 9 हजार 792 झाली आहे.
त्या तुलनेत गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने दिलासादायक गोष्ट आहे. दिवसभरात 628 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 हजार 792 सक्रीय बाधितांपैकी 95 जणांची प्रकृती गंभीर असून, सुमारे 40 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एकूण सक्रीय बाधितांमधील 7.71 जण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोन शहरातील आणि चार हद्दीबाहेरील आहेत. एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 124 झाली आहे.
संशयित पोहोचले 18 हजारांवर
बाधितांची संख्या वाढत चालल्याने संशयितांची संख्याही वाढली आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 86 जणांनी स्वॅब टेस्ट केली आहे. यामध्ये लक्षणे असलेल्या किंवा एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. यावरूनही बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येते.