पुणे – शहरात गेल्या 24 तासांत 524 नव्या बाधितांची नोंद झाली. तर, सक्रिय बाधितांची रुग्णसंख्याही वाढली आहे. हे वातावरण पाहता, नागरिकांनी कोठेही गर्दी करू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे.
दोन डझनापेक्षा जास्त आमदार आणि मंत्र्यांना झालेली करोनाची बाधा, एकूणच शहरातील बाधितांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय झाला आहे. राज्य सरकारने याविषयी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे, रात्री फिरण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत, याशिवाय जमावबंदी लागू करताना समारंभांवरही निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही शहरातील गर्दी मात्र आटोक्यात येत नाही.
गेल्या 24 तासांत 79 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय दोन बाधितांचा मृत्यू झाला असून,त्यातील एक शहरातील आणि हद्दीबाहेरील आहे. शहरातील एकाचा समावेश करून बाधित मृतांची संख्या आता 9 हजार 118 झाली आहे. याशिवाय 6 हजार 786 संशयितांची स्वॅब टेस्ट दिवसभरात करण्यात आली आहे.