पुणे : पुणे महापालिका आणि पुणे व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानातील 840 कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 26 कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना कोणतीही लक्षणे नसल्याने अधिकाऱ्यांनी होम क्वारंटाईन होण्यास सांगितले. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन शक्य नव्हते. त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विलीगीकरण कक्षात भरती केल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.
शहरातील सर्व भागात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सुरूवात लक्ष्मी रस्त्यावरील कपडे, सराफी दुकानातील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3 टक्के कर्मचाऱ्यांना करोना असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासणीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, राहण्याचा पत्ता आणि आधार कार्डची झेरॉक्स घेण्यात आली.
येणाऱ्या काळात विभागवार आणि वेगवेगळ्या असोसिएशनच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येतील, असे सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी सहकार्य केले. तर शिबीराचे आयोजन करण्यासाठी दिनेश सांकला, राजेश शेवाणी, मिलिंद शालगर, योगेंद्र अष्टेकर, नरेश राठोड, यशस्वी पटेल यांनी प्रयत्न केले.