नगरसेवक मारुती तुपे यांच्या प्रयत्नातून प्रभाग २३ मध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका
हडपसर : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेल्या गरीब, होतकरू आणि खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेची मोठी मदत होईल. या अभ्यासिकेत अभ्यास करून गरीब घरातील विद्यार्थ्यांनी मोठे अधिकारी व्हावे. अधिकारी होऊन चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करावी. यासाठी अभ्यासिकेचे हे केंद्र प्रेरणादायी राहील. असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
हडपसर सातववाडी – काळेबोराटेनगर प्रभाग क्रमांक २३ येथे महानगर पालिकेच्या वतीने नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या प्रयत्नातून यूपीएससी ,एमपीएससी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक मारुती आबा तुपे, जीवन जाधव , अमित गायकवाड, राजू महाडिक, संकेत झेंडे, सतीश भिसे,राजू बढे,ओंकार तुपे,सतीश केंद्रे,योगेश ढोरे, गोरख काळे ,मारुती आबा तुपे योगा ग्रुपचे सदस्य ,भाजप पदाधिकारी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की स्वर्गीय मुंडे साहेबांना कुठल्याही कामासाठी कधी मुहूर्त लागत नव्हता. साहेब आले की तोच मुहूर्त ठेवून त्यावर विकास कामे केली जात असे. आज त्या प्रमाणेच नगरसेवक आबा तुपे यांनी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त किंवा वेळ न पहाता मला बोलावून या अभ्यासिकेचे भूमिपूजन केले आहे. ही अभ्यासायिक लवकरच पूर्ण करून आपल्याच हस्ते तिचे लोकार्पण करावे, अशी अपेक्षा यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
साडेचार वर्षांत प्रभागात पन्नास कोटींची विकासकामे
गेली साडेचार वर्षांत प्रभागात पन्नास कोटींची कामे केली. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेतून ही काम केली आहेत. मुंडे साहेबांचा वारसा घेऊनच यापुढील काळातही याभागात विकास कामे करत राहणार आहे.सर्वे नंबर २९ ,आदर्श शाळेशेजारी ससाणेनगर येथे सुविधा संपन्न अशी अभ्यासिका उभारण्यात येत, असून लवकरच तीचे कामही सुरू करण्यात येणार आहे.
मारुतीआबा तुपे, नगरसेवक