मुळशीतील नागरिकांनी दिले तहसीलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना उपाययोजनांचे निवेदन
पिरंगुट- पुणे-कोलाड महामार्गावर दिवसेंदिवस अपघात वाढत आहे. यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. हा मार्ग महणजे मृत्यूचा सापळा झालेला आहे. मंगळवारी (दि. 10) झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्यातील पिरंगुट, भुकूम येथील नागरिकांनी तसेच सोनेरी मुळशी मित्रपरिवार व मुळशी तालुका पत्रकार संघ पिरंगुट यांच्यावतीने तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना अपघात कमी होण्याच्या संदर्भात “काय उपाय योजना करावे लागतील’ यासाठी निवेदन देण्यात आले.
लवळे फाटा ते पिरंगुट कॅम्प या परिसरात गेल्या दहा वर्षांमध्ये 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता; परंतु आता तो रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झालेला असून राज्य महामार्ग क्रमांक 60 वरून तो आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट, स्टील, वाळू, औद्योगिक कारखान्यांमध्ये लागणारी अवजड यंत्रे यांची वाहतूक होते.
- या सुचवल्या उपाययोजना
पिरंगुट घाटाच्या अर्ध्यावर आल्यानंतर त्याठिकाणी पोलीस चेक पोस्ट करण्यात यावी, त्यामुळे पुण्याकडून आलेल्या वाहनाचा वेग कमी होऊन त्या ठिकाणी थांबवली जाईल आणि त्या वाहनाचे गरम झालेले “लाइनर’ थंड होतील आणि पुढे चालकाला “ब्रेक’ लावताना तांत्रिक अडचण येणार नाही. कारण यापूर्वी अनेक अपघात वाहनाचे “ब्रेक’ निकामी होऊन चालकाचे नियंत्रण सुटून झालेले आहेत आणि त्यामध्ये एकाच वेळी 3 ते 7 जागेवर जणांचा मृत्यू झालेला आहेत. त्यामुळे पोलिसांनी पिरंगुट घाटाच्या मध्यावर चेकपोस्ट करावी. अतिशय अवजड वाहने असतील तर ती वाहने मुकाई वाडी मार्गे उरवडे मार्गे घोटवडे फाट्याकडे वळवण्यात यावी, त्यामुळे अतिशय वर्दळीच्या भागातून ही वाहने जाणार नाहीत आणि अपघाताला लगाम बसेल. लवळे फाट्यावर हॉटेल श्रीपाद ते पिरंगुट कॅम्पपर्यंत गतिरोधक बसविण्याची गरज आहे. - बैठक घेऊन कार्यवाही करणार
एम. एस. आर. डी. सी.च्या अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलून यावर उपाय योजना करण्यासंबंधी बैठक घेऊन कार्यवाही करायला सांगणार असल्याचे तहसीलदार अभय चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.