पुणे : बालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे पोलिसांकडून सिंहगड, कोथरूड, अलंकार, वारजे, उत्तमनगर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यांत बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली असून शनिवारी (२० नोव्हेंबर) पोलीस आयुक्त अमिताम गुप्ता यांच्या हस्ते सहा पोलीस ठाण्यांमधील बालस्नेही कक्षांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
दीड वर्षांपूर्वी राज्यातील पहिल्या बालस्नेही कक्षाची स्थापना लष्कर पोलीस ठाण्यात करणात आली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या भरोसा कक्ष आणि होप फोर द चिल्ड्रेन या संस्थेच्या वतीने कोथरूड, अलंकार, सिंहगड रस्ता, दत्तवाडी,वारजे, उत्तमनगर या पोलीस ठाण्यात आंतराष्ट्रीय बाल दिनाच्या मुहूर्तावर बालस्नेही कक्ष सुरू करण्यात येणार आहे. बालस्नेही कक्षाच्या उद्घाटन सोहळ्यास सहपोलीस आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुनील पवार, गजानन टोम्पे आदी उपस्थित राहणार आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियमाच्या प्रस्तावनेत बालकांसोबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणा बालस्नेही असणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बालकांच्या तक्रारींचे निराकरण करणे तसेच अल्पवयीन मुलांवरील दाखल गुन्हे याबाबत पोलीस तसेच होप फाॅर द चिल्ड्रेन या संस्थेतील स्वयंसेवक समुपदेशन करणार आहेत.
पोलीस ठाण्यांचे आवारात एखाद्याने प्रवेश केल्यास त्याला विशिष्ट वातावरण पाहायला मिळते. मात्र, बालस्नेही (चिल्ड्रेन फ्रेंडली) कक्षातील अंतर्गत रचना पूर्णपणे वेगळी असणार आहे.
बालस्नेही कक्षात मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी आहेत. त्यांना तक्रार किंवा समस्या मांडताना फारशी अडचण जाणवणार नाही. कक्षातील भिंतींवर कार्टुन्स असणार आहे. मुलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तेथे समुपदेशक असणार आहेत. कक्षात मुलांसाठी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत, असे परिमंडळ तीनच्या पोलीस उपायु्क्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.