पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.6) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे कर्वे रस्त्यावर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेसाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. यांसह मोदींच्या वाहनांचा ताफा महापालिका आणि कर्वे रस्त्याकडे जाताना संबंधित रस्ते मोदींच्या आगमनाच्या काही वेळ आधीपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या मार्गात होणार बदल
गरवारे कॉलेज ते आनंदनगर मेट्रो जंक्शन येथील मुख्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने खंडोजी बाबा चौक ते शिवतीर्थ नगरपर्यंत कर्वे रस्त्याने जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे. यादरम्यान नागरिकांनी कोथरुडकडे कर्वे रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी टिळक चौकातून लालबहाद्दूर शास्त्री रोडने सेनादत्त पेठ किंवा दांडेकर पुलामार्गे म्हात्रे पूल – डी. पी. रस्त्याने गुळवणी महाराज रस्ता, करिश्मा सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे. शिवतीर्थनगर येथून खंडोजी बाबा चौकापर्यंत
(डेक्कनकडे जाणारी) सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे. यादरम्यान शिवतीर्थनगर येथून मयुर कॉलनी- हुतात्मा चौक – निंबाळकर बाग – डी.पी. रस्ता किंवा गुळवणी महाराज रस्तामार्गे नदी पात्रातून डेक्कन किंवा सेनादत्त पेठ-लालबहाद्दू शास्त्री रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जावे.