पुणे –महापालिका शाळांमधील 1 ली ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी महापालिकेकडून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. याशिवाय, शाळेची पट संख्या निश्चित होताच जून महिन्याअखेरीस या मुलांना इतर शालेय साहित्य तसेच गणवेशासाठीची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.
इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून मोफत पुस्तके पुरविली जातात. त्यामुळे ही पुस्तकांची खरेदी महापालिका करत नाही; तर 9 वी व 10 वीच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी महापलिका पुस्तक खरेदी करते. त्यानुसार, इयत्ता 9 वीसाठी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमासाठी 50 हजार 321, 10 वीसाठी 50 हजार 799 असे एकूण 1 लाख 1 हजार 120 पुस्तकांची खरेदी केली जाईल. तर रात्र शाळेच्या 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 हजार 560 व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 हजार 260 असे 2 हजार 820 पुस्तके खरेदी केले जातील. यासाठीच्या खर्चाला महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून बालभारतीकडून ही पुस्तके खरेदी केली जाणार आहे.
पटसंख्या अनिश्चित
महापालिकेकडून पालिका शाळांमधील पटसंख्या 86 हजारपर्यंत गेली असल्याचे गृहित धरले आहे. करोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर मार्च महिन्यात पालिकेच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू झाल्या होत्या. त्यानंतर या शाळा उन्हाळी सुट्टीसाठी बंदच होत्या. 2015-16 पर्यंत महापालिका शाळेतील मुलांची पटसंख्या 1 लाखांच्या वर होती. मात्र, ती हळूहळू कमी होत आहे. त्यातच, या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबांतील मुले तसेच स्थलांतरिल मजुरांची मुले आहेत. मात्र, करोनामुळे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर आपल्या गावी परत गेले होते. त्यातील अनेकांनी अद्याप परतीची वाट धरलेली नाही. तर अनेक मुलांनी या संकटानंतर शाळाच सोडली आहे. परिणामी प्रशासन 86 हजार मुले असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे.