पुणे -“हिंदू जनआक्रोश मोर्चाला’ सकाळी अकरा वाजता लाल महालापासून सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे जाणार असल्याने येथील काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. लक्ष्मी रस्त्यावर प्रत्येक चौकात मोर्चाचे स्वागत करण्यात आले.
हातात भगवा ध्वज आणि घोषणा देत आंदोलक पुढे सरसावत होते. या मोर्चावर काही ठिकाणी पुष्पवृष्टी, भगव्या पताकांची वृष्टी करण्यात आली आणि स्वागतासाठी फटाकेही उडवण्यात आले. या मोर्चाच्या सुरूवातीला शंखनाद पथकही सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा भगवा ध्वज हातात धरून काही नागरिकांनी मोर्चाचे समर्थन केले. सुरूवातीला मोर्चा मध्ये बराच गॅप पडला. परंतु पोलिसांनी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांना वेगाने पुढे जाण्यास सांगितले आणि त्यानंतर हा मोर्चा पुढे गेला.
दुपारी एक वाजता हा मोर्चा डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला त्यावेळी कर्वेरस्ता, लकडी ब्रीज, खंडोजीबाबा चौक भगव्या रंगाने खुलून गेला होता. याठिकाणी हिंदूत्त्वाच्या घोषणा देण्यात आल्या. येत्या 21 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ जेथे आहे, त्या वढू या गावी जायचे आहे. तेथेही एवढ्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी दीपक नागपुरे यांनी मोर्चा झाल्यानंतर केले.