पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून सदाशिव पेठेत तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली होती. त्यामध्ये अटक केलेल्या शंतनू लक्ष्मण जाधव (वय 21 , रा. डोंगरगाव, ता. मुळशी) याला सत्र न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी जामीन मंजुर केला आहे.
त्याने अॅड.अभिषेक किसन हरगणे,अॅड.स्वप्नील लहु चव्हाण आणि अॅड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. तपास अधिकारी बोलावती त्यावेळी तपासास हजर राहणे, कारागृहातून बाहेर आल्यानंतर सात दिवसात पासपोर्ट जमा करणे, या अटींवर हा जामीन मंजुर केला आहे.
27 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित 20 वर्षीय तरूणीने याबाबत विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला.