“प्रभात वृत्ता’ची पोलिसांनी दखल घेतल्याने अवैध धंदे, दुकानदारी बंद
हर्षद कटारिया
बिबवेवाडी – गुलटेकडी येथील बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाखाली मुख्य रस्त्याच्या भिंतीलगत गेली अनेक वर्षांपासून ताडपत्रीचा आडोसा घेत अंदाजे वय वर्षे साठ असलेला मनोरुग्ण राहत होता. सतत चिलीम ओढत असलेल्या या इसमास त्याचे नाव सांगता येत नाही,
त्याच्या आजूबाजूच्या “करदुल्यां’नी त्याला धार्मिक “बाबा’ करीत त्याच्या “आशीर्वादा’ची पब्लिसिटी केली होती, यातून अनेक जण या बाबांकडे येऊ लागले होते. यातून होणाऱ्या किरकोळ-चिरकोळ “कमाई’वर करदुल्यांचे खाणेपिणे तसेच गांजा, मद्य अशा व्यसनांचा खर्च भागत होता. यातून येथे जुगार अड्डाही सुरू झाला होता. याबाबतची सत्यस्थिती “प्रभात’ने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी या गैरप्रकाराची दखल घेतली.
पोलिसांनी कायदेशीर मार्गाने संबंधित मनोरुग्णाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्या स्वच्छतेसह आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आता, “बाबा’ ससूनमध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी “बाबा’च्या नावाखाली दुकानदारी करणाऱ्या करदुल्यांची गैरसोय झाल्याने अशा अस्वस्थ करदुल्यांनीही इतरत्र पळ काढला आहे.
प्रथमतः निर्भीडपणे सदर विषयाला वाचा फोडल्याबद्दल मी दैनिक “प्रभात’चे अभिनंदन करतो. वृत्त प्रसिद्ध होताच आम्ही सदर जागी पाहणी करून जादूटोना कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया करीत होतो. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्याने त्यांचेही आभार मानतो. नागरिकांनी अंधश्रद्धा प्रकरणाबाबत सतर्क राहावे.
– श्रीपाल ललवाणी, राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मनोरुग्ण इसमाबाबत दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर कायदेशीर पद्धतीने संबंधित इसमाला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार केले जात असून, योग्य काळजी घेतली जात आहे.
– सोमनाथ जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा)