पुणे – प्रभारी शिक्षण उपसंचालकांची नियुक्ती

कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय

पुणे – प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण आयुक्तांमार्फत प्रभारी शिक्षण उपसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयात काही ना काही कामाच्या निमित्ताने सतत पालक, शिक्षक, संघटनांचे पदाधिकारी येत असतात. मात्र यांची कामे लवकर मार्गी लागत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्यासह इतर अधिकारी कार्यालयातून नेहमीच गायब होत असतात. प्रमुख अधिकारीच भेटत नसल्याने विविध कामांच्या फायली निर्णयाअभावी धूळखात पडल्याचे चित्र पहायला मिळते. त्यातच आंदोलनाच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. वाढीव फी वसुली करणाऱ्या शाळांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ पालकांनी शिक्षण संचालकांच्या खुर्चीला चपला व बांगड्यांचा हारही घातल्याचा प्रकार गेल्या काही दिवसात घडला आहे. यामुळे या विभागावर अनेकांकडून टीका करण्याचा धडाका लावला होता.

याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे बऱ्याच जणांनी तक्रारी दाखल केल्या. या तक्रारीची स्वत: आयुक्तांनीही पडताळणी करुन पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याबाबत आयुक्तांनी वारंवार सूचनाही दिल्या आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणीच होत नसल्याचे आढळून येऊ लागले आहे.

अखेर प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाच्या प्रतिमेत कामकाजाद्वारे बदल घडविण्यासाठी प्रभारी शिक्षण उपसंचालक हरुन आतार यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. आतार कार्यालयात उपस्थित राहत असल्याने आता इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.