पुणे-2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलत गुणांसाठी 25 मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार दि.15 मार्च ते 25 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज नमुन्यात सादर करावा. दहावीच्या परिक्षेतील प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत सातवी व आठवीमध्ये या विद्यार्थ्याचे क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय सहभाग व प्राविण्य जे असेल त्यातील सर्वोच्च कामगीरीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
बारावीच्या परीक्षेमधील प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्याच्या बाबतीत नववी व दहावीत क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. परंतु, खेळाडूने दहावीत प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र असणार नाही. एकविध खेळ संघटना क्रीडा संचलनालयाने मान्यता दिलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी व प्राविण्य खेळाडूच क्रीडा सवलत गुणास पात्र राहणार आहेत.
दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल तर संबंधित खेळाडूची सर्वोच्च कामगिरी असलेल्या एकाच खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करावे लागणार आहे. प्रस्तावासोबत दहावी व बारावीचे परीक्षा प्रवेशपत्र, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे सहभाग प्रमाणपत्र, क्रीडा सवलत गुण अर्ज विहित नमुना, बारावीच्या विद्यार्थ्यासाठी दहावी गुणपत्रकाची प्रत आवश्यक असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.