इगो म्हणजे अहंकार. इगो ट्रिप याचा अहंकार-विभ्रमण असा मराठीत अर्थ सांगता येईल. आपलं स्वत:चं महत्त्व किंवा योग्यता येन-केन प्रकारेण वाढवून सांगणं किंवा तसं दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करणं अशी इगो ट्रिपची व्याख्या आहे. बढाई मारणं आणि इगो ट्रिपमध्ये पुसटसा फरक आहे. बव्हंशी बढाई मारताना लंब्या-चवड्या थापा ठोकण्याची कृती होत असते. इगो ट्रिपमध्ये मात्र खरंखुरं घडलं असेल तर ते जरा जास्त रंगवून, तिखट-मीठ लावून सांगणं किंवा घटना घडलेली असताना जाणीवपूर्वक तिला महत्त्व देणं किंवा घटनेकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणं या गोष्टींचा समावेश होतो.
उदाहरणार्थ, कॉलेजमध्ये एखादी सुंदर तरुणी असते. तिनं आपल्याशी बोलावं, आपल्याबरोबर कॉफी प्यायला यावं असं बहुसंख्य तरुणांना वाटत असतं. फारशा स्मार्ट नसलेल्या एखाद्या मुलाला त्या तरुणीबरोबर वार्तालाप करण्याची किंवा तिला कॉफी प्यायला न्यायची संधी मिळाली तर तो अगदी छाती पुढे काढून, त्या मुलीला अगदी खेटून चालत, तिच्याशी जरा मोठ्यानंच संवाद साधत (जवळपासच्या मुलांना ऐकू जावं यासाठी!) जाईल. याचाच अर्थ तो इगो ट्रिपवर आहे हे नक्की.
सामान्यत: एखाद्या त्रुटीबद्दल टीका होत असेल तर मनुष्य इगो ट्रिपकडे वळतो. समजा, आपला एक मित्र खूप भित्रा असेल आणि त्याची भित्रा भागूबाई म्हणून टवाळी होत असेल तर तो संधी मिळताच इगो ट्रिपवर जातो. म्हणजे, अगदी नकळत त्याच्या हातून चांगलं काम झालं असेल तर तो त्याला स्वत:च्या धैर्याचा रंग देऊन तो प्रसंग अधिक खुलवून, तिखट-मीठ लावून सांगेल. अंधाऱ्या रात्री भीतिदायक वातावरणात चालताना त्याला सोबत मिळाली असेल तर वास्तविकत: त्या सोबतीमुळे तो भयमुक्त झालेला असेल. मात्र ही गोष्ट मित्रांना सांगताना तो असं म्हणेल की सोबतची व्यक्ती खूप घाबरलेली होती आणि मी असल्यानं तिचं भय दूर झालं.
मी स्वत: देखील इगो ट्रिपवर गेलो आहे. कोण्या एके काळी कंपनीतील राजकारणामुळे अधिकारश्रेणीमध्ये मी मागे पडलो. माझे अनेक सहकारी मोठ्या पदांवर पोचले. काही वेळा ते माझी चेष्टा करीत, साहेबांबरोबर जमवून घे असा अनाहूत सल्लाही देत. त्याच सुमारास समस्या सोडविण्याच्या माझ्या कौशल्यामुळे इतर प्रभागांमधील मोठमोठे साहेब त्यांच्या क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मला बोलावीत. खूप वेळा त्यांच्याबरोबर खास भोजनाचा लाभही मला होत असे.
अशा वेळी माझे उच्चपदस्थ मित्र अस्वस्थ होत. मग मलाही त्यांच्या उपहासात्मक उपदेशाची आठवण होऊन मी त्यांना साहेब लोकांचे काही किस्से रंगवून सांगत असे-काही वेळा कल्पित गोष्टीही घुसडून देत असे. कुण्या साहेबांनी मला ड्रिंक पार्टीला बोलावलंय् तर कुणी मला अजून मोठ्या साहेबांशी परिचय करून देणार आहेत असं मी त्यांना सांगत असे. हे इगो ट्रिपचं अगदी माझं स्वत:चंच उदाहरण आहे.
तुम्हाला आपल्या मित्रमंडळी तसंच नातेवाईक किंवा शेजारी-पाजारी यांच्यात इगो ट्रिपवर गेलेले अनेक नमुने सापडतील. नेते, अभिनेते आणि शिकारी किंवा साहसी खेळातील मंडळी खूपदा इगो ट्रिपवर असलेली आढळतात. याचं कारण म्हणजे आपण समाजमनावर सतत आरूढ असावं असं त्यांना वाटत असतं. स्थानिक नेते एखाद दुसऱ्या नागरिकाला केलेली मदत वाढवून सांगतात आणि जणू संपूर्ण विभागाचा कायापालट केला असं भासवतात.
अभिनेते/अभिनेत्री आपल्या हातात बिग बजेट चित्रपट आहे किंवा मोठ्या स्टारबरोबर किंवा दिग्दर्शकाबरोबर काम करत आहोत अथवा करणार आहोत अशी आवई उठवून देतात. अनेकदा ते प्रसिद्ध व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरण असल्याची धूळ उडवतात. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात नृत्यदिग्दर्शकानं आपल्याला ब्रिटिश राजपुत्राच्या स्वागत समारंभाला आमंत्रित केल्याची अफवा पसरवली होती. त्यानंच एका जगप्रसिद्ध अमेरिकन गायिकेसोबत “डेटिंग’ करत असल्याचंही काही प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. अर्थातच या सगळ्या “फेक न्यूज’ असल्याचं सर्वांच्या नंतर लक्षात आलं. इतर कुठल्याही ट्रिपसारखाच इगो ट्रिपवर जायचा प्रत्येकाला मोह होणं स्वाभाविक आहे. परंतु, म्हणतात ना-थाप पचेल अशीच मारावी!
– श्रीनिवास शारंगपाणी