पुणे – देशातील सर्वांत प्रतिकूल सीमाभागांपैकी महत्त्वाच्या असणाऱ्या सियाचीन येथील जवानांसाठी शहरातील चिथडे दाम्पत्याने ऑक्टोबर 2019 मध्ये पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लष्कराकडे सुपूर्द केला आहे. कुपवाडा येथे नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाद्वारे दर मिनिटाला 224 लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून, यामुळे हजारो जवान आणि स्थानिकांना याची मदत होणार आहे.
हवाई दलात सेवा बजावलेले योगेश आणि त्यांच्या पत्नी निवृत्त शिक्षक सुमेधा यांच्या “सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन’ (सिर्फ) या संस्थेने दुसरा ऑक्सिजन प्रकल्प उभारला असून, तो सैन्याला नुकताच समर्पित केला. याबाबत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चिथडे यांनी माहिती दिली. यावेळी एअर मार्शल डी. पी. जोशी (नि.), महाराष्ट्र सैनिक कल्याण विभागाचे कर्नल राजेंद्र जाधव (नि.), कर्नल बिपिन शिंदे, सिर्फचे विश्वस्त चंद्रशेखर बोरोले आदी उपस्थित होते.
विद्यार्थी आणि नागरिकांपुढे चांगले आदर्श असावेत, या भावनेतून आम्ही तिन्ही जीवित परमवीर चक्र विजेत्यांचा पुण्यात सत्कार केला. त्यावेळी सियाचीनचे हिरो मानद कॅप्टन बाणासिंग यांच्या अनुभवातून सीमेवर प्रतिकूल वातावरणात कार्यरत असणाऱ्या जवानांसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. 2017 मध्ये आम्ही सिर्फची स्थापना केली. त्यानंतर ऑक्सिजन प्रकल्पाच्या ध्यासाने राज्यभर व्याख्याने देत नागरिकांना मदतीचे आवाहन केले. त्यातून अडीच कोटी रुपयांच्या पहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे 4 ऑक्टोबर 2019 रोजी सियाचिन येथे उद्घाटन झाले, असे चिथडे यांनी सांगितले.
त्यानंतर जम्मू काश्मीर येथील कुपवाडामध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. निधी संकलनादरम्यान लॉकडाऊन आणि करोनामुळे अडचणी आल्या. मात्र, वेबिनार आणि ऑनलाइन मिटिंगच्या माध्यमातून अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचून आम्ही निधी संकलित केला.
सुमारे 3 कोटी रुपयांतून उभारलेल्या दुसऱ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन 15 एप्रिल रोजी झाले. या प्लॅंटसाठी मुंबईच्या मेघना काळे यांनी विनायक काळे यांच्या स्मृत्यर्थ जनरेटर सेट भेट दिला आहे. येत्या काळात वीरपत्नींसाठी सुव्हेनिअर शॉप, एकाकी निवृत्त अधिकारी, जवानांसाठी वृद्धाश्रम आणि लष्करी रुग्णालयांसाठी सोलर प्लांट उभारण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.