पुणे- “आता फसलेल्या उड्डाणपुलाची कथा आणि कोथरूडकर नागरिकांच्या वाढलेल्या व्यथा’असा नारा देत कोथरूड नागरिक संघाने कर्वे रस्त्यावरील या नवीन उड्डाणपुलास विरोध केला आहे.
नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामेट्रो आणि महापालिकेने उड्डाणपूल उभारला. या पुलामुळे नळस्टॉप चौकातील कोंडी फुटली असली, तरी पौड रस्त्यावरील उड्डाणपूल आणि कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यानंतर आता महापालिकेने करिष्मा सोसायटी चौक ते महर्षी कर्वे पुतळ्यापर्यंत आणखी एक उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. कर्वे पुतळ्या जवळ हा पूल “वाय’ आकारात असणार आहे. पण, ज्या मार्गावर हा नवीन पूल प्रस्तावित आहे.
त्या मार्गावर कुठेही चौक नाही तसेच वाहतूक पोलीस असो व नसो या ठिकाणी कधीही वाहतूक कोंडी होत नाही. त्यामुळे पूल नकोच अशी भूमिका या भागातील नागरिकांनी घेतली आहे. त्याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
- काय आहे नागरिक संघाची भूमिका
- हा रस्ता कमी अंतराचा असून कुठेही चौक नाही
- करिष्मा चौक आणि मयूर कॉलनी चौकातील वाहतूक सिग्नल बंद असतानाही सुरळीत असते.
- कर्वे रस्त्याला पर्यायी असलेल्या मयूर कॉलनीतील रस्ताही अंतिम टप्प्यात आहे.
- भविष्यात या मार्गावर मेट्रो होणार असल्याने चारचाकी व दुचाकींचा वापर कमी होईल.
- पौड रस्त्याला मेट्रो सुरू झाल्याने या चौकातील वाहतुकीचा भार कमी झाला आहे.
- हा पूल झाल्यास नळस्टॉपची कोंडी होईल. पर्यायाने त्रास सहन करावा लागेल.
- कर्वे रस्त्यावरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन केल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल. असे या नागरिकांचे म्हणणे आहे. त्यावर
- निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
- अशा असतील प्रायोगिक उपाययोजना
- खिलारेवाडी आणि मेहंदळे गॅरेज चौकाडून आलेल्या चारचाकी वाहनांना हॉटेल निसर्गकडून कर्वे रस्त्याकडे बंदी असेल. या
- वाहनांना नळस्टॉप चौकात येऊनच कर्वे रस्त्याकडे जावे लागेल. या रस्त्यावर केवळ दुचाकी असतील.
- एसएनडीटी चौकाच्या परिसरात असलेले एसटी महामंडळ आणि पीएमपीचा बसथांबा कर्वे रस्त्यावर दशभुजा गणपतीजवळ नेला
- जाईल. तसेच जुन्या थांब्याच्या ठिकाणी रिक्षांनाही उभे राहण्यास मनाई असेल.
- उड्डाणपुलावरून कर्वेनगरच्या बाजूला उतरताना पौडफाट्याकडे उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी स्वतंत्र बॅरिकेटिंग लेन असेल. तर
- नळस्टॉप चौकातून कर्वे रस्त्याने आलेल्या वाहनांना डाव्या बाजूने स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर जाता येईल.
- व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार उड्डाणपुलाखाली पे अँड पार्किंग सुविधा सुरू होणार
- उड्डाणपुलावरून कर्वे रस्त्याकडे आल्यानंतर रेस्कॉन कंपनीकडे वळण्यास वाहनांना बंदी असेल, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.
महापालिकेने तब्बल 50 कोटींहून अधिक खर्च करून उभारलेल्या नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा चुकला आहे. त्यामुळे उड्डाणपूल संपताना एसएनडीटी महाविद्यालयासमोर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ती सोडवण्यासाठी महापालिकेने पुलाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा ते पंधरा दिवसांसाठी हे बदल असतील.
अडचण काय?
नळस्टॉपकडून पौड रस्त्याकडे जाणारी वाहने आणि उड्डाणपुलावरून कर्वेरस्त्याकडे जाणारी वाहने उड्डाणपूल संपल्यानंतर समोरासमोर येत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
उपस्थित कोण?
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह, महामेट्रो, महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग, वाहतूक पोलीस तसेच पीएमपीचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. पुढील 2-3 दिवसांत प्रायोगिक तत्वावर होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
व्यापाऱ्यांची नाराजी
या कोंडीबाबत आसपासच्या व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून रस्ता लहान झाल्याने ग्राहकांना पार्किंगासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे पालिकेने पुलाच्या खालील बाजूस पे अँड पार्किंगची सुविधा देण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या बदलांबाबत परिसरात जागृती केली जाणार असून त्यानंतर अंमलबजावणी होणार आहे.