खडकवासला (विशाल भालेराव) –ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यापूर्वीच हवेली तालुक्याच्या पश्चिम भागात राजकीय पक्षांसह इच्छुकांनी आपापले गट आणि गणांमध्ये जनसंपर्कावर भर देत मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या स्वरूपांचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने आतापासूनच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत.
आगामी वर्षातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी खडकवासला परिसरात आतापासूनच गट-गणात संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन करण्यासह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून गावोगावच्या ग्रामस्थांच्या बैठका घेण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार बरसण्यास सुरुवात झाली आहे. कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावरही निवडणुकीच्या दृष्टीने गट आणि गणांचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणता गट आणि गणामध्ये किती लोकसंख्या आहे, किती गावे आहेत, लोकसंख्या वाढलेली असल्यास गट वा गणाची संख्या वाढणार आहे का, लोकसंख्या घटलेली असल्यास आहे, त्या गट वा गणांची संख्या घटणार आहे का? याची चाचपणी केली जात आहे.