पुणे – शहरातील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली असून, येत्या काळात हवेच्या प्रदूषणात आणखी वाढ होण्याचा इशारा “आयआयटीएम- सफर’ या संस्थेने दिला आहे. संस्थेच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा गुणवत्तांक 180 इतका असून, ही गुणवत्ता काहीशी धोकादायक स्तरावर पोहचली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) संस्थेच्या “सफर’ उपक्रमांतर्गत देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार महानगरांमधील हवेच्या गुणवत्तेची सातत्याने नोंद घेतली जाते. संस्थेच्या नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीनुसार, पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली असून, ती “चांगली’ या स्तरावरून काहीशी धोकादायक स्तरावर पोहचली आहे. शहरातील कात्रज, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, लोहगाव तसेच पिंपरी- चिंचवड येथील भोसरी, निगडी, भूमकर चौक अशा सर्वच भागांमध्ये हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवेत गारवा वाढल्याने, तिचे अभिसरण कमी प्रमाणात होत आहे. परिणामी, प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने पीएम 10 या घटकाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. संस्थेच्या नोंदीनुसार, हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 138 मॅट्रिक प्रतिघन मीटर आहे, तर पीएम 2.5 या प्रदुषकाचे प्रमाण 84 मॅट्रिक प्रतिघनमीटर इतके आहे. येत्या दोन दिवसात हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 155 मॅट्रिक प्रतिघन मीटरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.