पुणे – पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बार्टीचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण,निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शिक्रापूर येथील वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० फिरते दूचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खाजगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पुरेशा प्रमाणात औषधसाठादेखील ठेवण्यात आला आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सुचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था ( पब्लीक ॲड्रेस सिस्टिीम) करण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे परिसरावर नजर राहणार असून त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करुन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० वाजता मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल. सकाळी ९.३० वाजता ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल, अशी माहिती बार्टीच्यावतीने देण्यात आली आहे.