पुणे – सध्या राज्यात मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा हा दि. ३१ जानेवारी २०२४ असून या टप्प्यात मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात आली. त्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. अर्जाच्या पूर्ततेसाठी हवी असणारी कागदपत्रे नागरिकांना जलद मिळावीत, यासाठी हवेली क्र्मांक क्र.१ व २ ही कार्यालये दि.१५ ते दि. ३१ जानेवारी या कालावधीत नवीन दस्तनोंदणी होणार नाही.
मात्र, नागरिकांना अर्जाच्या नकला देणे तसेच अभय योजनेचे काम सुरू राहणार असल्याचे नोंदणी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हवेली क्र. २१, २२ व २३ या कार्यालयांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करून त्या दिवशी या तीन कार्यालयात दस्त नोंदणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचा प्रस्ताव मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याचे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यास नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी मान्यता दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ अंतर्गत १९८० ते २००० या कालावधीत नोंदणीसाठी दाखल दस्तांमध्ये जर १ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची मुद्रांक शुल्क़ थकबाकी असेल, तर मुद्रांक शुल्कात १०० टक्के माफी मिळणार आहे.
ही सवलत मिळण्यासाठी दि. ३१ जानेवारीही अंतिम मुदत आहे. पुणे शहरातील हवेली क्र्मांक १ आणि २ या दोन दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये अशा प्रकरणांची संख़्या जास्त आहे. या दस्तांना अभयय योजनेचा लाभ देता यावा, यासाठी यासाठी हवेली क्रमांक १ आणि २ ही दोन कार्यालयात दि. ३१ जानेवारीपर्यंत नवीन दस्तनोंदणीचे काम बंद ठेवले जाणार आहे. मात्र, अभय योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे देण्याचे काम सुरू राहणार आहे.
शनिवार,रविवारीही काम सुरूच
दरम्यान हवेली क्रमांक २१, २२ अणि २३ या तीन कार्यालये शनिवारी आणि रविवारी सुध्दा सुरू असतात. आणि या कार्यालयांना सोमवारी आणि मंगळवारी साप्ताहिक सुट्टी देण्यात येते. आता यामध्ये बदल करून या तीन कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी रद्द करून सोमवारी आणि मंगळवारी ही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हिंगाणे यांनी सांगितले. तसेच तीनही दुय्यम निबंधक कार्यालये दस्तनोंदणीसाठी सुरू ठेवण्याबाबतचे सुयोग्य नियोजन करावे जेणेकरुन पक्षकारांना दस्तनोंदणी करताना अडचणी येणार नाहीत, अशा सूचना नोंदणी महानिरीक्षकांनी दिल्या आहेत.