पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो विस्तारीकरण केले जाणार आहे. यासाठी स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या सात नवीन मेट्रो मार्गाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
महामेट्रोकडून दोन मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. त्यापैकी वनाज ते रामवाडी या मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यानुसार वनाज ते चांदणी चौक या दीड किलोमीटर, तर रामवाडी ते वाघोली या 12 किलोमीटर मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबरच हडपसर ते खराडी, स्वारगेट ते हडपसर, खडकवासला ते स्वारगेट यांसह सात नवीन मेट्रो मार्ग मार्गांचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व मार्गांचे सर्व्हेक्षण करून डीपीआर तयार करण्याचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक किलोमीटरचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पंधरा लाख रुपये या प्रमाणे सुमारे 15 कोटी 87 लाख एवढा खर्च येणार आहे.
यापैकी 50 टक्के म्हणजे साडेसात कोटी रुपये राज्य सरकारने द्यावेत. तर खर्च केंद्र सरकारने उचलावा, अशी मागणी महामेट्रोने राज्य सरकारला केली होती. त्यास राज्य सरकारने तत्वत: मान्यता देत महामेट्रोने पहिले खर्च करावा. त्यानंतर राज्य सरकार तो निधी परत करेल, असे कळविले होते. त्यानुसार महामेट्रोकडून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात या नवीन मार्गांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आठ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.