पुणे – मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा महापालिकेच्या जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वानवडीतील बापूसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये घडली.
गणेश पुंडलीक पाटोळे (वय 17, रा. गल्ली क्रमांक 7, सरवदे वस्ती मागे. साठे नगर, महमदवाडी) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. गणेश व त्याचे मित्र रेहान, अजय असे तिघेजण रविवारी दुपारी वानवडीतील शिवरकर मार्गावर असलेल्या महापालिकेच्या भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. रेहानला पोहता येत नसल्याने तो कमी पाण्यामध्ये थोडावेळ थांबला, त्यानंतर तो पाण्याबाहेर आला. तर अजय व गणेश हे दोघेही नव्यानेच पोहायला शिकले असल्याने त्यांना पोहता येत होते. त्यामुळे ते दोघेही नेहमीपेक्षा यावेळी जास्त खोल पाण्यात उतरुन पोहत होते.
दरम्यान, जलतरण तलावामधील पाणी गढूळ झाल्याने अजयला पोहताना त्रास होऊ लागला. त्यामुळे अजय काही वेळ पाण्यात पोहून बाहेर पडला. त्याने कपडे परिधान केले. त्यानंतर बराच वेळ होऊनही गणेश पाण्याबाहेर आला नाही. त्याचा जलतरण तलावामध्ये शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे अजय व रेहान या दोघांनी तत्काळ तेथील जीवरक्षकांना सांगितले. त्यांनी काही वेळाने जलतरण तलावामध्ये शोध घेतला, त्यांनाही गणेश आढळून आला नाही.
अखेर तलावातील पाणी कमी करण्यात आले. तेव्हा, गणेश पाण्यामध्ये बुडाल्याचे निदर्शनास आले. अजय, रेहान व जीवरक्षकांनी त्याच्यावर प्रथमोपचार करुन त्यास रुग्णालयात नेले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.